प्रवासास निघताना
(१) प्रवासास दिनवार आराखडा आधी तयार ठेवावा. रेल्वे, बसच्या सुटण्याच्या वेळा, क्रमांक इ. माहिती एका लिहून ठेवावी. प्रवास, निवास, भोजन, स्थळदर्शन, धार्मिक विधी इ.चा खर्चाचा अंदाज आधी काढून मार्गातील निवासांचे पत्ते, फोन नंबर्स घरी देऊन ठेवावेत.
(२) रेल्वेची रिझर्व्हेशन्स करताना परतीला लागणारा कालावधी निश्चित झाल्यावर त्यामध्ये एक दिवसाचे मार्जिन ठेऊन परतीचे रिझर्व्हेशन करावे.
(३) कनेक्टेड रेल्वे निवडताना काही तासांचे मार्जिन ठेवावे कारण एखाद्यावेळी रेल्वे अपेक्षेपेक्षा उशीरा पोहोचू शकते.
(४)हॉटेल्सचे रिझर्व्हेशन क रताना शक्यतो रेल्वे/बस स्टेशन जवळचे हॉटेल निवडावे.
(५) कंडक्टेड टुर/साईट सिईंगच्या वेळी ठराविक ग्रुपबरोबरच राहावे आणि बसमधून उतरताना बसचा क्रमांक लिहून घ्यावा, तसेच त्याचा पुढचा कार्यक्रम समजून घ्यावा म्हणजे जर बस चुकलीच तर दुसऱ्या वाहनाच्या मदतीने त्यांना गाठता येते.
(६) प्रवासामध्ये जरूरीपुरतेच सामान बरोबर घ्यावे. बॅगेवर आतून बाहेर पूर्ण नाव पत्याचे स्टिकर लावावे. नायलॉन दोरी व सामान बांधायला साखळी न्यावी. बऱ्याच ठिकाणी हमाल मिळत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी स्वतःलाच सामान न्यावे लागते त्यामुळे “ट्रॅव्हल लाईट” हे लक्षात ठेवावे.
(७) प्रवासामध्ये गरजेपुरतेच पैसे नगद स्वरूपात ठेवावेत बाकी शक्यतो ट्रॅव्हलर चेक्स सोबत ठेवावेत. प्रवासाची तिकिटे/हॉटेल्सची रिझर्व्हेशन आणि ट्रॅव्हलर चेक्स असा महत्वाच्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेऊ नयेत. बॅगेमध्ये एकाच ठिकाणी अशा वस्तू ठेवल्यास सर्वच गोष्टी चोरीला जाण्याचा संभव असतो.
(८) बरोबर घ्यावयाच्या वस्तूमध्ये गरजेची औषधे स्वतःबरोबर घ्यावीत. कंडक्टेड टुरमध्ये जाणाऱ्या लोकांनी आयोजकांना आपल्याला असणाऱ्या आजाराची ( दमा /डायबेटीस/रक्तदाब) आधीच कल्पना द्यावी.
(९) लवंग, वेलदोडे, अँटासिड्, जेष्टमध पावडर, सर्दी-खोकला इ.साठी औषधे, सूतशेखर ड्रॉप्स, इ. औषधांप्रमाणेच प्रथमोपचार साहित्य (आयोडिन, कापूस, बरनॉल, कॅलेंडुला, बँडेज, आयोडेक्स, डेटॉल) कोल्ड क्रीम, मच्छर कॉईल, ओडोमॉस इ. बरोबर ठेवावे.
(१०) गाडी लागत असल्यास प्रवासाआधी बोट ओले क रून एक मिनिट कानात घालून ठेवावे. असे पुन्हा तीन वेळा करावे. गाडी लागत नाही. तसेच ज्येष्ठमधाची काडी किंवा विडयाचे पान तोंडात धरल्यास उपयोग होतो.
(११) आपल्या घराचा पत्ता, फोन नंबर, जवळच्या नातेवाईकांचे पत्ते, ऒळखपत्र, बरोबर ठेवावेत.विशेषतः वयस्कर व्यक्तिंसाठी याची अतिशय गरज असते. घरचा पत्ता घातलेली पास्टकार्डे तयार ठेवावीत.
(१२) सहली ठरविताना शक्यतो सीझन चा विचार करावा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर दरवर्षी हमखास पर्जन्यवृष्टी होते. जुलै-ऑगस्टमध्ये आसाम भागात नदयांना पूर येतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये जम्मू-श्रीनगरचा रस्ता (जवाहर टनेल) बर्फ वृष्टीने एक आठवडा बंद होतो. अशा वेळी अडकून पडण्याची भिती असते.
(१३) प्रवासात अनोळखी माणसाला आपले नाव, पत्ता, व्हिजिटिंग कार्ड इ. देऊ नये. अनोळखी व्यक्तीने दिलेले पार्सल इत्यादी घेऊ नये. खरेदीसाठी आवश्यक तेवढे पैसे आधीच वर ठेवावेत. किरकोळ खरेदीसाठी उगाच नोटांची बंडले काढून त्यातून पैसे देणे टाळावे.
(१४) मुलांसाठी कोरडा खाऊ बरोबर ठेवावा. बिस्किटाचे पुडे बरोबर ठेवल्यास सोयीचे होते. बरोबर साखर, मिठाचे छोटे प्लॅस्टिक डबे ठेवावे. फक्त लिंबे विकत घेउन हवे तेव्हा ताजे सरबत तयार! भटकंतीचेवेळी तहान-भुके साठी खजूर, सुकामेवा, खडीसाखर, छोटया प्लॅस्टिक पिशव्यातून न्याव्या. लिम्लेटच्या गोळयाही ठेवाव्यात.
(१५) बॅगेत छोटी कु लूपे, सुरी, कात्री, चमचे, पाणी पिण्यास ग्लास ( रेल्वेत सावकाश चहा पिण्यास अडचण येत नाही) सोपबॉक्स, अंगाचा व कपडयांचा साबण, टुथ ब्रश-पेस्ट, सुई-दोरा, बटणे, मेणबत्या, काडेपेटी इ. बरोबर ठेवल्यास ऐनवेळी उपयोगी पडतात, “प्रवासी डायरी” बरोबर ठेवावी !



